कुडाळ - “युवकांचा देश बनू पाहणाऱ्या भारतात युवकांना योग्य शिक्षणाच्या माध्यमातून दिशा देण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, “”देशात येत्या काही वर्षांत सर्वाधिक संख्या युवकांची असेल. याबरोबरच बेरोजगारीसह अन्य समस्याही वाढतील. या युवकांना योग्य दिशा मिळाल्यास देश प्रगतीकडे जाईल; पण योग्य शिक्षण, दिशा मिळाली नाही तर मात्र स्थिती गंभीर बनेल.”
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई नव महाराष्ट्र युवा अभियान उपक्रमाअंतर्गत ध्येय प्रतिष्ठान आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने कोकणातील तरुणांसमोरील आव्हाने आणि नवी दिशा या चर्चासत्राचे आयोजन येथील बीएड महिला महाविद्यालयात खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कोकणात येथील तरुणांना विकासाच्या नवीन दिशा देणारे अनेक प्रकल्प आहेत; परंतु या प्रकल्पांना भौगोलिक समस्या येत असल्याने मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. येथील फलोत्पादन, मत्स्य, पर्यटनावर अर्थव्यवस्था बदलू शकते. लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने या बाबींकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. या चर्चासत्राच्या निमित्ताने श्रीमती सुळे म्हणाल्या, “”शैक्षणिक अंतर्गत गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविला पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचे धडे प्रत्येकाला मिळणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत मानवी गरजा आहेत. या गरजांपासून कोणीही अपेक्षित राहता कामा नये. आता युवकांच्या हातात देशाचा कारभार येणार आहे. आताच त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे. अन्यथा गंभीर प्रश्न निर्माण होईल. राज्यनिर्मिती होऊन इतकी वर्षे होऊनही आपण वीज, पाणी, आरोग्य या सुविधा देऊ शकलो नाही. याचे आत्मपरीक्षण राजकीय पक्षांनी करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी हा लोकांचा सेवक असतो. त्याच्या समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोकप्रतिनिधींनी करावा. या मताची मी आहे. लोकप्रतिनिधींनी मॅसेंजर बॉय व गर्ल या भूमिकेतून जनतेची सेवा केली पाहिजे. तरच विकास परिवर्तन होणार आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी. त्यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा उद्देश आहे. कोकणचा येथील साधनसामग्रीवर विकास होत असताना पर्यावरणाचा समतोल जर ढासळत नसेल, तर विकासाला विरोध करू नये. सहकार चळवळीचे बीज येथे रोवले पाहिजे. विजेचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. गेल्या दहा वर्षांत विजेबाबत कोणतीही पावले न उचलल्याने त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर झाला आहे.”
या वेळी “सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अरविंद शिरसाट म्हणाले, “”कोकणची अर्थव्यवस्था ही येथील फलोत्पादन, मत्स्य व पर्यटनावर अवलंबून आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात भौगोलिक परिस्थितीनुसार आव्हाने बदलत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन झाला. कोकणात मत्स्याला पोषक वातावरण असताना या ठिकाणी मत्स्यविज्ञान विद्यापीठ नाही. राजकीय नेतेमंडळी येथील तरुणांना मानसिकता बदलण्यास सांगतात. कोणावरही विकास लादला जाता कामा नये. कोकणात येणारे प्रकल्प हे निसर्ग जपणारे असावेत. निसर्ग नाहीसा करणारे असू नयेत.”
“महाराष्ट्र टाईम्स’चे पत्रकार कुमार कदम म्हणाले, “”पर्यटन घरोघरी पोहोचले पाहिजे. यात प्रत्येक कुटुंबाला गुंतविले पाहिजे. प्रत्येकाने मानसिकता बदलली पाहिजे. कोकणातील साधनसामग्रीवर राजकारण्यांचा डोळा आहे. येथील लोकांनी याबाबत जागरूक राहिले पाहिजे.”
अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले, “”कोकणामध्ये विकासाबाबत मनोवृत्ती बदलली पाहिजे. नवीन कल्पना आली की, त्याला विरोध केला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन गोव्याच्या तोडीस व्हायला हवेत. कायदे, निकष बदलावे लागतील. दुरुस्त्या कराव्या लागतील.”
या चर्चेत एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी सहभाग घेतला. “कालनिर्णय’चे संचालक जयराज साळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी निवेदन केले. चर्चासत्रात कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण पर्यटन संधी आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
या वेळी बाळ सराफ, नीलेश राऊत, विजय कान्हेकर, उमाकांत जगदाळे, सुनील सौदागर, ऍड. अजित भणगे, पुष्पसेन सावंत, ध्येय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सामंत, बॅ. नाथ पै संस्थेचे उमेश गाळवणकर, वंदना करंबळेकर, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
Recent Comments